top of page
संघटनेत कसे सहभागी व्हावे ?

अंधश्रध्दा निर्मूलनाचा विचार मानणाऱ्या, प्रचार-प्रसार करू इच्छिणाऱ्या किंवा समजून घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही वयाच्या जाती-धर्माच्या, लिंगाच्या आणि लैंगिकतेच्या व्यक्तीला संघटनेचे सभासद होता येते. त्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही. एक सभासद फॉर्म भरायचा असतो. तो भरून संबंधित शाखेत जमा केला की तुम्ही त्या शाखेचे सभासद होता. हे सभासदत्व एका वर्षासाठी असते. हे फॉर्म स्थानिक शाखेत उपलब्ध असतात.येथेही सभासद अर्ज दिलेला आहे.

मग आपल्या उपलब्ध वेळेनुसार शाखेच्या बैठका, उपक्रम यात सहभागी व्हावे. आपल्याकडील वेळ, श्रम, कौशल्ये, सहभाग यातून आपल्याला जबाबदारी मिळत जाते. म्हणजे आपण संघटनेचे कार्यकर्ते होता . हळूहळू संघटनेचे विषय, वैचारिक भूमिका, उपक्रम आणि कामाची पध्दत आपल्याला कळत जाते. यात आपलाच विकास होत जातो.

संघटनेत सहभागी झाल्यावर आपले व्यक्ती म्हणून काय फायदे होतात ?

 हा प्रश्न अंनिसच्या कार्यकर्त्यांना अनेकदा विचारला जातो. तुम्ही एवढे कार्यक्रम करता, फिरता, मग तुम्हाला त्याचे पैसे मिळतात का ? तर लक्षात घ्या यात कोणालाही काहीही पैसे मिळत नाहीत. उलट कार्यकर्ते आनंदाने स्वतःच्या खिशातूनच खर्च करत है काम करीत असतात. पण यातून कार्यकर्त्यांना मिळणारे अन्य फायदे हे मोजता येणार नाहीत असे आहेत. ते आपण समजून घेऊया !

१) अंनिस ही एक वैचारिक चळवळ आहे. या विचारांतून आपण घडत जातो. अधिक नेटका आणि सम्यक विचार करू लागतो..

२) आपले विचार तल्लख बनतात. तर्कशुध्द भूमिका घेऊन आपले व्यक्तिमत्व बहरते.

३) आपल्या गुण कौशल्यांना वाव मिळतो. त्यातून आपल्या व्यक्ती विकासाला गती मिळते.

४) सार्वजनिक जीवनात आपण अधिक जबाबदार नागरिक म्हणून वावरतो. सामंजस्यपूर्ण व्यवहार करू लागतो.

५) प्रसंगानुरूप पद, प्रतिष्ठा, प्रसिध्दी मिळते. (पण हे आपले ध्येय नसते.)

६) या कामात असल्यामुळे आपण आपोआप व्यसन, हिंसा, बेकायदेशीर वर्तन यापासून दूर राहतो. कुटूंबात, समाजात, आपल्या कामाच्या ठिकाणी याचा प्रचंड फायदा होतो.

 

७) आपण स्वतः अंधश्रध्दांपासून मुक्त झाल्यामुळे आपले कुटुंब, मित्रपरिवार, नातेवाईक अशा अनेकांना अंधश्रध्दांमुळे होणाऱ्या शोषणापासून वाचवू लागतो.

आपण आधार देण्याच्या मार्गदर्शन करण्याच्या भूमिका निभावू लागतो,

८) हे काम करीत असतांना आपण आपले विचार निर्भयपणे मांडू लागतो, प्रश्न विचारू लागतो.

९) वरील सर्व गुण हे आपल्याला एक जबाबदार नागरिक बनवतात. म्हणून देशाची लोकशाही समृध्द करण्याचं व्यापक काम आपण करतो. या अर्थाने आपण एक कृतिशील देशभक्तीच करीत असतो. इत्यादी अनेक फायदे यातून होतात

आपणांस जर थेट अंधश्रध्दा निर्मूलन समितीची शाखा सुरू करायची असेल तर त्याबाबतीत जाणून घेऊया !

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखा कशी स्थापन करता येते ? आपणांस जर आपल्या गावात, शहरात अंधश्रध्दा निर्मूलन समितीची शाखा स्थापन करायची असेल तर आमच्याशी संपर्क करा. मग आम्ही आपणाशी प्रत्यक्ष संपर्क करू.

शाखा सुरू करण्यास केवळ दोन व्यक्ती पुरेसे

अंधश्रध्दा निर्मूलनाचा विचार, प्रचार करू इच्छिणाऱ्या केवळ दोन व्यक्ती जरी असल्या तरी सुध्दा लगेच संपर्क शाखा सुरू करता येते. पाच व्यक्तींची क्रियाशील शाखा सुरू करता येते.

१. प्रत्यक्ष संपर्क झाल्यावर काम करण्यास इच्छुकांची स्वतंत्र बैठक घेतली जाते. त्यांना संघटनेचा विचार आणि कार्यपध्दती प्राथमिक स्तरावर समजावून दिली जाते. प्रश्नोत्तरे,शंकानिरसन केले जाते. मग चर्चा करून शाखेची स्थापना केली जाते.

२. प्रत्येक शाखा ही जिल्हा शाखेशी संलग्न असते.

३. एकाच शहरात दोन शाखा नसतात. महानगरांमध्ये कामाच्या सोयीसाठी विभागनिहाय शाखा होऊ शकतात पण तेही जिल्हा कार्यकारिणीच्या परवानगीने.

bottom of page